रविवार, २२ नोव्हेंबर, २०१५

चाहावाल्याचे पंख ..........

काय करतो? ......... चहा विकतो.
किती वर्षे झाली?........ चाळीसेक.
वय?...... साठीपार.
कर्ज?...... बरेच. कायमचे फेडतोय.
कशासाठी काढलेय?........ फिरण्यासाठी आणि shortfilm बनविण्यासाठी.
चौकोनी आयुष्य जगणाऱ्या मानसिकतेला अज्जिबात न पेलवणारा हा परिचय आहे श्री. हरि एम. मोहनन आणि त्यांची पत्नी मोहना यांचा!
केरळातल्या एर्नाकुलम् येथे गेली चाळीसेक वर्षे चहाचे दुकान चालविणाऱ्या या दाम्पत्याचे भटकंतीचे वेड कुणालाही आश्चर्य चकित करते. हातात पैसे असूनही कधीही आपल्या गावाशहराची वेस न ओलांडणारे लोक आहेतच! पण पैपै जमा करून केवळ, देशातच नव्हे, तर देशोदेशी भटकंती करणाऱ्या या जोडप्याचा जीवनप्रवास प्रेरणादायी आहे.
आजपर्यंत त्यांनी सुमारे सतरा देशांत भटकंती केली. त्यांत ईजिप्त, जोर्डन (Jordan ) सारखें मध्य पूर्वेतील, तर सिंगापूर, मलेशिया सारखे अतिपूर्वेकडील, युरोपातील सदैव हिटलिस्ट वर असणारे इंग्लंड, फ्रान्स, स्वित्झर्लंड, तर पार पलीकडे असणाऱ्या अमेरिकेचीही सफर त्यांनी केली.
पैशाची जुळवाजुळव हा महत्वाचा मुद्दा! पण ते सांगतात, ‘पैसा लागतोच! पण त्याहून जास्त महत्वाचे एक भटके, स्वच्छंद मन पाहिजे, मग कुठलेही ठिकाण दूर वाटत नाही!’
दररोज तीनेकशे रुपयांची बचत करूनही पैशांची तजवीज होत नव्हतीच. मग त्यांनी वेळोवेळी कर्ज काढले. फिरून आलं, कि दोनतीन वर्षे चहा विकून ते कर्ज फेडायचं. परत पुढचं destination, पुढचा देश, परत कर्ज, परत कष्ट, परत कर्जफेड हे चक्र! पण त्याचा त्यांना बोजा वाटत नाही. कारण भटकंतीतून मिळणारा आनंद, समाधान त्यापेक्षा कितीतरी जास्त! जगण्याचे बळ फिरतीतून मिळवणाऱ्या या जोडीला, उतारवयात कुटुंबीय, मित्रमंडळींकडून शहाणपणाचे, बचतीचे, कर्ज न काढण्याचे अनेक सल्लेही मिळालेत. पण या सगळ्याला मागे टाकून त्यांचा पुढचा प्रवास चालूच आहे.
आपला हा प्रवास अनेकानेक लोकांपर्यंत पोहचावा म्हणून या चिवट माणसाने एक shortfilm काढायचे ठरवले. अनेक नामांकित हस्तीपुढे प्रस्ताव ठेवला, पण प्रत्येकाने दहा मिनिटांची फिल्म तीन-चार मिनिटांची करा, असा सल्ला दिला. आता हातात पैसा नसताना, कुणाही सरळमार्गी माणसाने हा सल्ला ऐकला असता. पण मोहनन यांना ते काही पटले नाही.
मग या माणसाने Copybook Films ही अशीच एक छोटीशी फिल्मसंस्था गाठून, स्वतःच दहाएक मिनिटांची Invisible Wings नावाची फिल्म अपार कष्टाने तयार केली. आणि मागील महिन्यात म्हणजेच १५ ऑक्टोबर, अब्दुल कलामांच्या जन्मदिनी रिलीज केली. ...... हा हा म्हणता नेटच्या जगतात ही फिल्म वाऱ्यासारखी पसरली... पसरत आहे.यातून कित्येक लोक प्रेरणा घेताहेत. पण त्यामुळे त्यांचे कर्ज काही फिटत नाही. तरीही त्यांची जिद्द अपरंपार आहे. ही फिल्म जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावी, कळावी म्हणून ते ती निरनिराळ्या भाषांमध्ये डब करायच्या तयारीत आहेत. आणि हो, २०२० मध्ये आर्जेन्टिनाची सफर करायचा प्लानही तयार आहेच.
जगण्याच्या धकाधकीत आपली स्वप्नं कधी विरून गेली कळतही नाही. असुरक्षिततेची भावना, भविष्याची चिंता आपल्याला सतत करकचून बांधून ठेवते. पण अशी माणसे आपल्या स्वप्नांसाठी सगळ्या परीस्थितीवर मात करत हसतमुखाने समोर येतात, तेव्हा आपली स्वप्ने किमान उचकटून तरी बघण्याची इच्छा निर्माण होते. मोहनन यांचे शब्द ‘It’s possible! It’s possible! It’s possible!’ , पुन्हा जगण्याचे, स्वप्नांचे नकाशे हातात घ्यायला भाग पाडतात.
सामान्य माणसातील जिद्द, संघर्ष, आणि भटकंतीच्या या वेडाला सलाम!
साभार - शिवकन्या 

गुरुवार, १९ नोव्हेंबर, २०१५

शोध

जर पानगळ झालीच नाही तर नविन पालवी कशी येणार,तसेच जर ''मृत्यु नसेल तर नवा जीव कसा येणार'' पृथ्वीचा समतोल हा जन्म आणि मृत्यु ह्या दोन गोष्टीवर अवलंबून आहे.जेव्हा नवीन जीव जन्माला येतो तेव्हा सोबत ''मृत्यु'' नावाचे  अटळ सत्य घेउनच येतो

शुभ्र उमदा मी एक अश्व
करीत पादाक्रांत हे विश्व
करावयाचा आहे शोध
घ्यावयाचा आहे बोध
.....................मृत्यूचा!
बाळगुन मनाशी जिद्द
चपल तनुत एक उमेद
नजरेत एकाच ध्येय
धावणार मी असाच आहे
......................सुसाट!
माझिया जन्मानेच मला
जीवन्मंत्र आहे दिला
येणार ना मरण तुला
.....................कधीही
पण,मनी ती एक आस
भेटावयाचे मरणास
संपणार कधी हा प्रवास
एकचि ध्यास तो खास
....................अंतरात
आणि अशाच एका दिनी
यश प्राप्तिले प्रयत्नानी
पाहिले मरणाचे रूप
ते तर होते प्रतिरूप
....................जन्माचे!
मृत्युस त्या भेटता तत्क्षणी
टोल माझा खोल जाऊनी
भावना,वेदना लोपल्या
नव्हत्याच आत्ता कोठल्या
........................जाणिवा!
परतून पुन्हा होतो जन्मत
तोच मी,आत्माही तोच
बदलली केवळ काया
नव्या रुपात आता कराया
...........................मार्गक्रमण!
फ़क्त गाडी ती बदलीत
या गाडीतून त्या गाडित
पुन्हा एकदा तोच प्रवास
तोच मार्ग शोधण्याचा
........................मृत्युस.